ANNOUNCEMENTS
No Announcement
श्रीमती सूनितिदेवी सिंघानिया शाळेच्या मराठी विभागाने यंदा इयत्ता ९ वी मराठी द्वितीय भाषेच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी एक अत्यंत अभिनव विषय दिला. इथे नमूद करण्यास अत्यंत अभिमान वाटतो, विद्यार्थ्यांनी या विषयाचे अक्षरशः सोने केले. विषय होता समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती! शेतकरी, घरकाम करणाऱ्या महिला , गिर्यारोहक, सेवानिवृत्त सैनिक, पत्रकार, भूदल, नौदल, हवाईदल अधिकारी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने, अभ्यासपुर्ण पद्धतीने , सर्जनशीलतेने घेतल्या. गिर्यारोहकांशी संवाद साधताना, त्यांनी सर केलेल्या विविध मोहिमा, त्यातील आव्हाने, मोहिमांसाठी लागणारी साधन-सामुग्री अशा विविध विषयांची माहिती करून घेतली. पत्रकारिता, त्यातील आव्हाने या क्षेत्रातील विवीध संधी , स्पर्धा अशा विविध विषयावर अत्यंत मोकळेपणाने संवाद साधला. कृषी क्षेत्रात झालेली प्रगती, त्या क्षेत्राला मिळालेली आधुनिकतेची जोड, त्याचबरोबर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या अशा विविध विषयांवर सांगोपांग चर्चा केली. घरकाम करणाऱ्या मावशींशी सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधला आणि या उपक्रमाला एक वेगळाच दर्जा मिळवून दिला. सेवानिवृत्त सैनिक, त्यांचा लढा, त्यांच्या अंगी असलेली समर्पणाची वृत्ती, त्यांचा संघर्ष त्यांच्याच शब्दातून अनुभवला. असे हे मुलाखतींचे सत्र, गप्पांचा कट्टा एका वेगळ्याच उंचीवर जाऊन ठेपला. आणि विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध करुन गेला.