ANNOUNCEMENTS
Click here to check the result of Nursery - Academic Year 2025-2026.
श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया शाळेत २७ फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला. शिशु वर्ग ते माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘मराठी राजभाषा दिवस’ कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. कार्यक्रमाचा विषय ‘सण, संस्कृती आणि परंपरा’ होता. कार्यक्रमात एकूण १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी ‘सण, संस्कृती आणि परंपरा’ विषयावर आधारित सूत्रसंचालन, नाटक, गाणी आणि नृत्य सादर केली. नाटक सादरीकरणात महाराष्ट्रातील सण, संस्कृती आणि परंपरा जपण्याची प्राचीन कला, सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या मुलांना बघायला मिळते. विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाचा सुंदर प्रारंभ केला. ग्रामीण भागात पहाटे पहाटे येणारा वासुदेव साकारताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या गीत आणि नृत्याने कार्यक्रमात रंग भरले. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रसिद्ध जात्यावरच्या ओव्या विद्यार्थिनींनी सादर केल्या. शेतात पेरणीच्या दिवसातील लगबग विद्यार्थ्यांच्या शेतकरी नृत्यातून खुलून आली. श्रावणात मंगळागौरीला खेळले जाणारे विविध खेळ विद्यार्थिनींनी आनंदात सादर केले. शिशु वर्गातील बाळगोपाळांनी लक्ष वेधून घेणारे विठ्ठल गीत सादर केले. तसेच, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक टाळा आणि पर्यावरण वाचवा आधारित भारुड, गोपाळांचा जल्लोष करणारे लाडक्या कृष्णाबरोबर गोकुळाष्टमी नृत्य, पारंपारिक भोंडला नृत्य, सणांचे महत्व सांगणारे दिवाळी गीत आणि नृत्य, मराठी भाषेचा अभिमान असणारे गीत आणि नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. विद्यार्थ्यांनी आकर्षक शिरोभूषणे, कंठभूषणे, बाहुभूषणे घातली होती. विद्यार्थिनींनी कपाळावर कुंकू, नाकात नथ, गळ्यातील अलंकार अशी आभूषणे धारण केली होती. नृत्यामध्ये चिपळ्या, जाते, उखळ, घागर, सूप, चाळणी, तुळशी वृंदावन, भगवे झेंडे अशा अनेक पारंपारिक वस्तूंचा उपयोग केला. त्यामुळे महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृती दाखवताना, कार्यक्रमाला आकर्षक रूप मिळाले. विद्यार्थ्यांनी मराठी सुविचार, संदेश लिहिलेले विविध आकारातील बूकमार्क सर्व शिक्षकांना वाटले.
शाळेच्या मान्यवरांनी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. तब्बल दोन तास चाललेल्या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी मधुसूदन, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. कांचनमाला चाबुकस्वार, सर्व शिक्षक आणि प्रेक्षक विद्यार्थी वर्गाने टाळ्यांच्या गजराने सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.