Marathi Bhasha Gaurav Din
Feb 27, 2026
“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी” ही ओळ प्रत्येक मराठी मनाला अभिमानाने भारावून टाकते.
२७ फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. थोर कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार व आस्वादक समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर, टोपण नाव 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त ह्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. त्यांच्या साहित्याने मराठी भाषेला नवी उंची आणि जागतिक ओळख मिळवून दिली आहे.
मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या भावना, संस्कृती आणि परंपरेचे जिवंत रूप आहे. संत मांदियाळीतील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव अशा अनेक संतांच्या अभंग रचना आणि साहित्यिकांच्या लेखनाने मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे. ही भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून लाखो लोकांच्या अस्तित्वाची ओळख आहे.
मराठी भाषेची गोडी आणि तिचा साधेपणा मनाला स्पर्श करून जातो. आईच्या अंगाईगीतापासून ते प्रेरणादायी भाषणापर्यंत प्रत्येक ठिकाणी मराठीची ताकद जाणवते.
या दिवसाचे औचित्य साधून श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी प्रस्तावना, भाषाशैली, सुसंगती, सर्जनशीलता आणि प्रभावी मांडणीचा उपयोग करत दिलेल्या विषयांवर तर्कशुद्ध विचारांनी निबंध लेखन केले. त्यांच्या लेखनातून मराठी भाषेप्रती असलेली जिव्हाळ्याची भावना स्पष्टपणे जाणवली. इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कथालेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा प्रभावी वापर करून रंजक, अर्थपूर्ण व मूल्याधिष्ठित कथा लिहिल्या. कथांमधून विद्यार्थ्यांची भाषिक पकड, विचारसंपन्नता व सर्जनशीलता प्रकर्षाने दिसून आली. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी पत्रलेखन स्पर्धेत विषयाला अनुसरून प्रारूप, भाषाशैली, सुसंगती आणि सर्जनशीलतेचा योग्य उपयोग केला. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी जाहिरात लेखन स्पर्धेत सर्जनशीलता, ब्रॅंडचे नाव, ग्राहक आकर्षक घोषवाक्ये, सामाजिक संदेश आणि सहाय्यक साहित्याचा उपयोग करत दिलेल्या विषयांवर मनोवेधक जाहिराती तयार केल्या.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. मातृभाषेबद्दल प्रेम, अभिमान विद्यार्थ्यांमध्ये जागवणे तसेच मराठी भाषेचा सन्मान करणे, तिचा शुद्ध व योग्य वापर करणे आणि प्रत्येक पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेत उत्कृष्ट लेखन केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आली. मुख्याध्यापिकांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.