Singhania IBDP

‘महाराष्ट्र लोककला आणि लोकसंगीत'

Oct 14, 2022

श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया शाळेत इयत्ता ५ वी वरील वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्र लोककला आणि लोकसंगीत’ संवर्धनासाठी मोठ्या उत्साहाने गोंधळ, पोवाडा, भारुड आणि आदिवासी ‘ठाकर’ नृत्य सादर केले. कार्यक्रमात एकूण ४४ विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता.

गोंधळांत नाट्य, गीत आणि काव्य यांचा संगम असतो. विद्यार्थिनींनी कपाळावर कुंकवाचा मळवट तसेच गळ्यात कवड्यांच्या माळा, नथ अशी आभूषणे धारण करून कुलस्वामिनी आंबाबाईच्या विविध रूपांच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले.

पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडे प्रसिद्ध आहेत. प्रतापगडच्या पायथ्याशी.. पोवाडा सादरीकरणात विद्यार्थ्यांनी पटका, चुस्त पायजमा, सदरा अशी वेशभूषा परिधान करून मुख्य सूत्रधार शाहीर आणि कडव्यांत रंगविलेल्या मुख्य पात्राची बतावणी साथीदारांनी सादर केली.

लोकसंगीतात सामूहिकता, नृत्यपरता, अभिनय, गायन इ. अनेक प्रेरणांना एकाच वेळी स्थान दिल्याने नाट्यसंगीताला विशेष प्रसिद्धी मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले संत एकनाथांचे ‘भारुड’ विंचू चावला.. ह्या नाट्यसंगीत सादरीकरणास एक आकर्षक रूप मिळाले.

महाराष्ट्रातील मूळ निवासी आदिवासी जमातीचे पारंपरिक नृत्य हे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत चालत आलेले असते. विद्यार्थ्यांनी आकर्षक शिरोभूषणे, कंठभूषणे, बाहुभूषणे यांसारखे अलंकार परिधान करून ‘ठाकर’ जमातीचे नृत्य सादर केले.

शाळेच्या मान्यवरांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी लोककला आणि लोकसंगीताचा मनमुराद आनंद घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी मधुसूदन आणि श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. कांचनमाला चाबुकस्वार ह्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

ANNOUNCEMENTS
ANNOUNCEMENTS