ANNOUNCEMENTS
- The Online Application for Nursery Admission forms for the academic year 2026-27 are now open. Click Here
आलें वारकरी करिती जयजयकार । गरुडटके भार असंख्यात ॥ त्या सुखाचा पार जाणें तोचि एक । भक्त पुंडलिक भाग्यवंत ॥ प्रेमे महाद्वारी घालुनी लोटांगण । देती आलिंगन एकमेंकां ॥ निडारले नयन पीतांबरधारी । देखिले विटेवरी पांडुरंग ॥ आषाढी एकादशीनिमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया शाळेच्या अंगणात इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणात विठ्ठल–रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा अनेक संतांच्या आदरयुक्त वारकरी वेशभूषेत सजून दिंडीमध्ये सहभाग घेतला. डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात टाळ, चिपळ्या आणि भगवे ध्वज असलेल्या या पायी सोहळ्यात 'जय जय राम कृष्ण हरी', 'ज्ञानदेव तुकाराम', 'विठ्ठल विठ्ठल' या नामोच्चारांचा गजर करत दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, सांस्कृतिक विभाग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही दिंडीमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. या सोहळ्यातील सादरीकरण जसे फुगड्या, गोल रिंगण, अभंग कीर्तन यामुळे वातावरण भक्तिमय आणि आनंददायी झाले. विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये फक्त वारकरी यथार्थतेची महती नाही तर पर्यावरण जागरूकता, स्वास्थ्य, वृक्षारोपण, शिक्षण व समानता याचे संदेशही दिंडीच्या माध्यमातून फलकांद्वारे दिले. शाळेत पार पडलेल्या दिंडी सोहळ्यातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे जीवन आणि महाराष्ट्रातील जनश्रद्धा यांची ओळख झाली. भक्तीगीत, अभंग, कीर्तनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मज्ञान, आत्मविश्वास आणि सहानुभूती वाढली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी सामाजिक समरसता आणि सामाजिक सहभाग यांची अनुभूती घेतली. हा वारकरी दिंडी सोहळा म्हणजे एक असा सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक दृष्ट्या संपन्न अनुभव होता, ज्यातून विद्यार्थी वारकरी परंपरेशी जोडले गेले. ह्या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक, सांस्कृतिक व जीवन मुल्यांची जाणीव झाली. हा दिंडी सोहळा केवळ धर्मप्रवचन नव्हे, तर संस्कार, संस्कृती, समरसता आणि समाजबद्धतेचा उत्सव ठरला.